spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे जागतिक हिमोफेलिया डे उत्साहात साजरा

गडचिरोली :- जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वार्ड क्रमांक १० मध्ये जागतिक हिमोफेलिया डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश हिमोफेलिया या रक्तस्रावाशी संबंधित दुर्मिळ आजाराबाबत जनजागृती करणे व रुग्णांना योग्य उपचार व काळजीबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात रुग्ण व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिमोफेलिया या आजाराचे स्वरूप, त्याची कारणे, लक्षणे, निदान व उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रुग्णांना नियमित तपासणीचे महत्त्व, आवश्यक औषधोपचार, तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास एकूण ४ हिमोफेलिया रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, डॉ. इंद्रजीत नागदेवते (भिषक वर्ग १), डॉ. मनीष मेश्राम (भिषक तज्ञ), डॉ. बागराज धुर्वे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. राकेश चहांदे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. अंजली साखरे (BTO), डॉ. आशिष खुणे (वैद्यकीय अधिकारी), आशा बावणे (सहायक अधिसेविका), उमा तुरणकर (परिसेविका) तसेच हिमोफेलिया रुग्ण व परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिमोफेलिया रुग्णांनी नियमित उपचार घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे व जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच कुटुंबीयांनीही रुग्णांची योग्य काळजी घेणे व त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. छाया उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हिमोफेलिया रुग्णांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा, औषध पुरवठा व उपचार सेवा यांची माहिती दिली. त्यांनी रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित रुग्णांनी आपले अनुभव व्यक्त केले व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंका निरसन केले. तसेच हिमोफेलिया रुग्णांसाठी सुरक्षित जीवनशैली, योग्य आहार व नियमित फॉलो-अप याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून हिमोफेलिया आजाराबाबत समाजात जनजागृती होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Popular Articles