हंसराज, भंडारा :- भंडारा तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायत सध्या आपल्या वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आली आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाकडून केवळ सूडभावनेतून आणि निवडून काही विशिष्ट कुटुंबांना लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी वर्षा नवखरे यांनी केला आहे. या दुहेरी मापदंडामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वर्षा नवखरे यांनी एका पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडताना सांगितले की, प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाविरोधात केलेली कारवाई ही पूर्णतः आकसबुद्धीने प्रेरित आहे. परिसरात अनेक ठिकाणी पक्क्या संरक्षण भिंती आणि मोठी अतिक्रमणे असताना, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, केवळ त्यांच्याच घरावर कारवाईचा बडगा उगारून प्रशासनाने आपला पक्षपातीपणा सिद्ध केला आहे.
या कारवाईदरम्यान ‘समायोजन’ (Adjustment) या गोंडस नावाखाली काही आर्थिक व्यवहारांच्या सूचनाही देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप नवखरे यांनी केला आहे. प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले की, नियम सर्वांसाठी समान का नाहीत? केवळ आर्थिक ताकद नसलेल्यांनाच लक्ष का केले जात आहे?
वर्षा नवखरे या विधवा असून त्यांच्या घरात उपजीविकेचे कोणतेही स्थिर साधन नाही. अशा परिस्थितीत, घर पाडण्यासारखी टोकाची कारवाई करणे हे केवळ अन्यायकारक नसून अमानवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका बाजूला सरकार महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन एका हतबल महिलेचे छप्पर हिरावून घेत असल्याची टीका परिसरात होत आहे.
ग्रामपंचायतीच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवताना त्यांनी गांधी वॉर्डातील उघड्या विहिरीचा प्रश्न उपस्थित केला. या विहिरीमुळे आजवर अनेक अपघात झाले असून मुक्या जनावरांचेही बळी गेले आहेत. नागरिकांच्या जिवाला असलेला हा धोका प्रशासनाला दिसत नाही का? असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांकडे पाठ फिरवून केवळ सूडबुद्धीने अतिक्रमणावर कारवाई करणे, हा प्रशासनाचा कोणता न्याय? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि अतिक्रमणाचे निकष सर्वांना समान लावले जावेत, अशी मागणी वर्षा नवखरे यांनी केली आहे. प्रशासनाने आपली भूमिका न सुधारल्यास आणि अन्याय सुरूच राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.








