spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान

– भर उन्हात कर्तव्य बजावताना वाढला आरोग्याला धोका

नागपूर :- शहरात एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका तीव्र झाला असून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर ‘बीट द हिट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच मोर्चे, कार्यक्रम आणि विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी तासन्तास उभे राहणाऱ्या पोलिसांना उष्णतेचा फटका बसत आहे.

शहरात व्हीआयपींची वर्दळ वाढल्याने सातत्याने पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते. त्यात वाहतूक पोलिसांकडे शहरातील वाहतुकीची जबाबदारी असते. त्यामुळे बंदोबस्त आणि वाहतूक संचालनासाठी पोलिस कर्मचारी दिवसभर उन्हात रस्त्यावर असतात. विशेष म्हणजे, सध्या नागपूरसह संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत वाहतूक पोलिसांसह बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी सावलीची कमतरता, सततचा उभा राहण्याचा ताण आणि वाहनांच्या धुरामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पाण्याची कमतरता आणि सततचा उष्णतेचा संपर्क यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो.

त्यामुळे पोलिसांनी नियमित पाणी, ओआरएस, लिंबूपाणीचे सेवन करणे आवश्यक आहे. दरम्यान, पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने काही ठोस उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

बंदोबस्त व वाहतूक ठिकाणी तात्पुरते शेड उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्युटी शिफ्टमध्ये बदल, तसेच कुलिंग जॅकेट किंवा सन-प्रोटेक्शन साधनांचा वापर यांसारखे उपाय प्रभावी ठरू शकतात. याशिवाय, नियमित वैद्यकीय तपासणी व विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Popular Articles