– जाणून घ्या कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
अकोला :- अकोला रेल्वेच्या स्वयंचलित ब्लॉक प्रणालीचे काम होणार असल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे. अनेक गाड्या विलंबाने धावणार असून वेळापत्रक कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत पारस – गायगाव – अकोला विभागात अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ – बडनेरा विभागात काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्वरूपात विलंबाने धावणार आहेत.
‘या’ गाड्या विलंबाने धावणार २३ एप्रिल रोजी रोजी सुटणारी गाडी क्र. १२४८२ नांदेड – श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी काटेपुर्णा – शेगाव विभागात सुमारे दोन तास विलंबाने धावेल. २३ एप्रिल रोजी सुटणारी गाडी २२७२३ नांदेड – श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावेल. २२ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. १७६०५ काचीगुडा – भगत की कोठी एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावेल. २२ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्र. १२७१९ जयपूर – हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावेल. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी व त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाड्यांची एक फेरी वाढविण्याच्या निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या विद्यमान थांबे, वेळापत्रक सह चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती – अकोला विशेष, गाडी क्रमांक ०७६०६ अकोला – तिरुपती विशेष यासह इतरही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन प्रवास सोयीस्करपणे नियोजित करावा, असे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.








