spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

युद्धाचा भडका, पेंट व्यवसायाला फटका; मागणी घटली ; केमिकलच्या दरात १०० टक्क्यांपर्यंत वाढ

नागपूर :- अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे. केमिकलच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे रंग उद्योगाचे (पेंट इंडस्ट्री) गणित पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्या दीड महिन्यांत रंगांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारातील मागणी २५ टक्क्यांनी घटली आहे. ऐन तेजीच्या काळात रंगांचा व्यवसाय फिका पडला आहे.

रंग तयार करण्यासाठी लागणारे मुख्य घटक म्हणजे रेझिन, सॉल्व्हंट, थिनर आणि पिगमेंट. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, या केमिकलच्या दरात ५० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

दररोज बदलणाऱ्या दरांमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. उत्पादकांना रंगांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रंगांच्या किमतीत सरासरी २० टक्के वाढ झाल्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. घरांच्या किंवा इमारतींच्या रंगरंगोटीचे बजेट बिघडल्याने अनेक ग्राहकांनी कामे पुढे ढकलली आहेत. यामुळे बाजारातील मागणीत २५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. सततच्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्येही नाराजीचे चित्र आहे.

कच्च्या मालावर दर अवलंबून

पूर्वी केवळ दिवाळीतच घरांची रंगरंगोटी करण्याची परंपरा होती, पण आता आधुनिक जीवनशैलीमुळे वर्षभर रंगांचा व्यवसाय तेजीत असतो. नागपुरातील वाढते शहरीकरण आणि पायाभूत सुविधांमुळे या क्षेत्राला उभारी मिळाली होती. मात्र, जागतिक स्तरावरील अस्थिरतेने या उद्योगाचा ”रंग” उडाला आहे. कच्च्या मालाचे दर स्थिर न झाल्यास येणाऱ्या काळात रंगांच्या किमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“रंगाचा व्यवसाय आता केवळ दिवाळीपुरता मर्यादित नसून तो वर्षभर चालतो. नागपूर शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर या व्यवसायाला चांगले दिवस आले होते. मात्र, युद्धामुळे केमिकलच्या दरात झालेली वाढ व्यवसायासाठी मारक ठरत आहे. दररोज केमिकलच्या दरात वाढ होत असल्याने उत्पादक आणि विक्रेते दोघांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. जर युद्ध लवकर थांबले नाही, तर हा उद्योग मोठ्या संकटात सापडेल.”

– अरुण लांजेवार, संचालक विशाल पेंट्स.

Popular Articles