Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘जागतिक हिवताप दिन’ निमित्त शहरातील १० झोनमध्ये जनजागृती उपक्रम

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे २५ एप्रिल ‘जागतिक हिवताप दिन’ निमित्त शहरातील सर्व १० झोनमध्ये व्यापक जनजागृती रॅली तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये हिवताप (मलेरिया) प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. रॅलीद्वारे स्वच्छता राखणे, साचलेले पाणी टाळणे, डासांच्या उत्पत्तीस्थळांचे निर्मूलन करणे तसेच आवश्यक ती काळजी घेणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

लकडगंज, हनुमान नगर, गांधीबाग, लक्ष्मीनगर, धरमपेठ, नेहरू नगर, आशीनगर, मंगळवारी, धंतोली आणि सतरंजीपुरा या सर्व झोनमध्ये पदयात्रा, जनजागृती मोहीम, पत्रकांचे वितरण आणि प्रत्यक्ष संवादाद्वारे हिवताप प्रतिबंधाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.

हिवतापमुक्त शहर घडवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असून, ही जनजागृती मोहीम त्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मनपाचे वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांनी सांगितले. भरतवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावर्षी “मलेरिया मुक्त नागपूर, आरोग्यदायी नागपूर” या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी स्वच्छता राखणे, साचलेले पाणी टाळणे तसेच डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर परिसरात पाणी साचू न देणे, कुलर, टाक्या, फुलदाण्यांची नियमित स्वच्छता करणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करणे, या उपाययोजना मलेरिया प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मनपाचे मलेरिया फायलरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांनी सांगितले.

या मोहिमेदरम्यान ताप सर्वेक्षण, अळीनाशक सर्वेक्षण, औषध फवारणी तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व साचलेले पाणी टाळावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत ताप निगराणी तसेच मलेरिया व फायलरिया नियंत्रणासाठी नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मलेरियावर प्रभावी नियंत्रणासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अळीनाशक फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), गप्पी मासे वाटप तसेच रक्त नमुने घेऊन दररोज निदान व उपचारासाठी UPHCs व NMC रुग्णालयांमध्ये सेवा दिली जात आहे. सर्वांनी मिळून स्वच्छता राखत “हिवताप दुरीकरणासाठी कटीबद्ध – आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य सभापती मनिषा अतकरे,उपसभापती श्रीकांत आगलावे, नगरसेवक  रामप्रसाद शाहू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, क्षयरोग तज्ञ् डॉ. शिल्पा जिचकर,मलेरिया फायलरीया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, झोनल अधिकारी डॉ. ख्वाजा, डॉ. विजयकुमार तिवारी,सुरेश खरे, मलेरिया निरीक्षक सचिन मेश्राम, नित्यानंद लंगोटे, प्रीतम पाटील, हत्तीरोग नियंत्रण विभागाचे निरीक्षक योगेश नागे, एम.एस.यू चे सर्व MSU अधिकारी – कर्मचारी व सर्व झोनचे आशा व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.