– शहरात सात बेघर निवारा गृहांमध्ये 450 व्यक्तींची क्षमता
नागपूर :- उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव व्हावा, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी या उद्देशाने मनपाद्वारे दरवर्षी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येते. शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी शहरतील विविध सात ठिकाणी शहरी बेघर निवारागृहाची व्यवस्था केली आहे. शहरातील या सात बेघर निवारा केंद्रांमध्ये 450 व्यक्तींची राहण्याची क्षमता आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी उपाययोजनात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर असलेल्या व्यक्तींचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात सात ठिकाणी बेघर निवारे सुरू केलेले आहे. त्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सध्या एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेचे तापमान ४५ डीग्री अंश सेल्शियसच्या वर गेले आहे. याच अनुषंगाने महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शानानुसार बेघर निवाऱ्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे.
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उष्माघातामुळे बेघर व्यक्तीची जीवितहानी होऊ नये यासाठी नागपुर शहरातील सार्वजनिक ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात येत आहे. तसेच बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचाराची सोय बेघरासाठी समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 27 एप्रिल रोजी शहरातील विविध बेघर निवारागृहामध्ये सहा जणांना नव्याने आश्रय देण्यात आला आहे. सध्या शहरात असलेल्या शहरी बेघर निवारा केंद्रांमध्ये 445 जणांना आश्रय देण्यात आलेला आहे.
नागपूर शहरांमध्ये खालीलप्रमाणे शहरी बेघर निवारे व भिक्षेकरी निवारागृह कार्यरत आहेत.
आधार शहरी बेघर निवारा, बुटी कन्या शाळा, सीताबर्डी- क्षमता 50, संपर्क क्रमांक :- 9130453027
सावली शहरी बेघर निवारा, हंसापुरी, प्राथमिक शाळा भानखेडा- क्षमता – 100, संपर्क क्रमांक :- 9049752690
आश्रय शहरी बेघर निवारा गृह बंगाली पंजा, जागनाथ बुधवारी – क्षमता 30, संपर्क क्रमांक :- 9326274455
बोधीसत्व बेघर निवारा गृह, इंदोरा – क्षमता 20, संपर्क क्रमांक :- 9373647753
आपुलकी बेघर निवारागृह, इंदोरा – क्षमता 50, संपर्क क्रमांक :- 9579691137
आस्था भिक्षेकरी निवारागृह, कॉटन मार्केट – क्षमता 150, संपर्क क्रमांक :- 9960327532
शांती सदन महिला भिक्षेकरी निवारागृह, मुस्लिम वाचनालय, सदर – क्षमता 50, संपर्क क्रमांक :- 9766032765

