Thursday, April 30, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

– लस पुर्णपणे सुरक्षित,वंध्यत्व, गर्भपात किंवा इतर कुठलेही गंभीर दुष्परिणाम नाही  

– अफवांना बळी न पडण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका, आरोग्य विभागामार्फत महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने एचपीव्ही HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिम 2026 राबविण्यात येत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात येत असून, दिनांक 8 मार्च 2026 (जागतिक महिला दिन) पासून महाराष्ट्र राज्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सदर मोहीम 90 दिवस (3 महिने) कालावधीसाठी चालणार आहे. एचपीव्ही हा विषाणू महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतो. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यावर प्रतिबंधासाठी ही लस अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे.

भारतात 2024 मध्ये सुमारे 78,499 गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून 42,392 मृत्यू या रोगाने नोंदविण्यात आले आहेत. यावर प्रतिबंधासाठी हे लसीकरण आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारा सदर लस प्रमाणित करण्यात आली असून ती सुरक्षित व प्रभावी आहे.जगभरात 50 कोटींहून अधिक महिलांना ही लस देण्यात आली असुन या लसीमुळे वंध्यत्व, गर्भपात किंवा इतर गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, असे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही लस साधारणपणे खाजगी रुग्णालयात 3 ते 4 हजार रुपयांमध्ये उपलब्ध असते; मात्र या मोहिमेअंतर्गत मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असुन महानगरपालिकेमार्फत ती मोफत दिली जात आहे.

14 वर्षे पूर्ण केलेल्या व 15 वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी ही लस उपलब्ध आहे.लसीकरणासाठी U-WIN पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, पालकांची संमती बंधनकारक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा जन्मतारीख पुरावा आवश्यक आहे.लसीकरणासाठी येताना मुलींनी नाश्ता करून येणे आवश्यक असून, लसीकरणानंतर 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे.तरी सर्व पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

लसीकरण केंद्रे –

चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत खालील 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (UPHC) लस मोफत उपलब्ध आहे

इंदिरा नगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबुपेठ, भीवापुर व आसरा तुकुम.

वेळ –

दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 (रविवार व सुट्टीचे दिवस वगळून)

शनिवार सकाळी 9 ते 12

जनजागृती –

महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये पालक सभा, आशा सेविकांमार्फत गृहभेटी, तसेच विविध प्रसार माध्यमांद्वारे या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.