– रामटेक-चिंचाळा मार्गावरील झुकलेला पूल
सचिन चौरसिया, रामटेक :- रामटेक-काचुरवाही मार्गावर चिंचाळा गावाजवळ पेंच नहरच्या ३० व्या किलोमीटरवर असलेला पूल झुकल्याने मागील ८ महिन्यांपासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. १३ सप्टेंबर रोजी पुलात भेगा पडून गंभीर तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ वाहतूक बंद केली होती. मात्र इतका कालावधी उलटूनही दुरुस्ती किंवा नव्या पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर पूल सन १९८० मध्ये पेंच नहर बांधकामादरम्यान उभारण्यात आला होता आणि तो या भागातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग होता. पूल बंद झाल्याने रामटेक, काचुरवाही, लोहडोगरी, हातोडी, खोडगाव, किरणापूर, दुधाळा, बारसी, तारसा व मौदा या गावांतील संपर्क मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. नागरिकांना आता नवरगाव व संग्रामपूरमार्गे लांब व अरुंद पर्यायी रस्ता वापरावा लागत असून, या मार्गाचीही दुरवस्था असल्याने वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. चिंचाळा येथील शेतकरी मिताराम सवालाखे व लोहडोगरी येथील दामोदर घरजाडे यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुलाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पेंच पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार नव्या पुलाचा प्रस्ताव प्रक्रियेत असून आराखडा तयार करून तो पीडब्ल्यूडी विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. कामाला प्राधान्य देऊन लवकर पूर्ण केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

