– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढले वाभाडे
मुंबई :- वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या केवळ एका जागेचा निर्णय घेताना नाकीनऊ आलेल्या महाविकास आघाडीची कॉमेडी सर्कस पाहून या आघाडीला घरी बसवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता आनंदी आणि समाधानी आहे. विधान परिषदेच्या जागेवर नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची हे कळत नाही त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी वाभाडे काढले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
महाविकास आघाडीत विधान परिषदेची एकच जागा निवडून येणार आहे. परंतु या एका जागेसाठी महाविकास आघाडीचे जवळपास 500 लोक इच्छुक असताना उद्धव ठाकरेंनी परस्पर अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आपला एक गट उद्धव ठाकरेंच्या विरोधात सक्रिय करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला की तुम्ही का विधान परिषद लढली तर तुमचा पराभव होईल. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय बळी न देता अंबादास दानवे यांचा राजकीय बळी देण्यासाठी त्यांना पुढे केले. आता काँग्रेस बैठका घेऊन आम्हीच ही उमेदवारी लढणार आणि आम्हीच विधान परिषदेची जागा जिंकणार अशा अविर्भावात जोर बैठका काढत असल्याने महाविकास आघाडीमधील तीन तिघाडा आणि काम बिघाडा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीतले हे तीन पक्ष एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, असे बन यांनी सांगितले.
अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे नाहीत तर फक्त आणि फक्त उबाठा गटाचे उमेदवार आहेत. आता अंबादास दानवे यांना किती मते पडतील, काँग्रेसने उमेदवार दिला तर किती मते पडतील आणि महायुतीने जादा उमेदवार दिला तर तुमची काय अवस्था होईल, हे पहा. महायुतीही यासंदर्भात योग्यवेळी योग्य निर्णय घेईल. अंबादास दानवे यांचा राजकीय बळी या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांनी घेतला एवढेच मला सांगायचे असल्याचे बन म्हणाले.
सातत्याने राज्य काँग्रेसच्या नेत्यांचा अपमान करणे, हर्षवर्धन सपकाळ यांना गृहीत धरणे, नाना पटोले यांना न विचारणे, विजय वडेट्टीवारांना किंमत न देणे हे संजय राऊत यांचे धोरण आहे. संजय राऊत सांगतात की राहुल गांधींसोबत आमचे उत्तम संबंध आहेत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विचारत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आता विधान परिषदेसाठी जेव्हा आपला उमेदवार घोषित करतील तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि येत्या दोन वर्षांत जेव्हा तुमची राज्यसभेची निवडणूक असेल तेव्हा काँग्रेस तुम्हाला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांना महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवलाय. ते एकदाही जनतेतून निवडून येऊ शकले नाहीत मुंबईतल्या महापालिकेतील एखादा वार्ड जिंकून आणता आला नाही अशी संजय राऊत यांची स्वतःची अवस्था आहे त्यामुळे संजय राऊत, इतरांवर टीकाटिकपणे करण्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण केले तर बरे होईल, असे बन यांनी ठणकावले.

