– पैसे वाचवण्याच्या नादात मृत्यूला निमंत्रण
नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरातही वाढत्या उष्णतेदरम्यान वीजेची मागणी वाढली आहे. त्यातच शहरात वीजचोरीचा एक धक्कादायक आणि जीवघेणा प्रकार उघडकीस आला आहे. वैशाली नगर परिसरात एका ई- रिक्षा चालकाने आपले वाहन चार्ज करण्यासाठी थेट सार्वजनिक वीज वाहिनीवर हुक टाकणे सुरू केले आहे. या अवैध जोडणीसह ई- रिक्षा चार्जिंग करत असतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसते की, संबंधित रिक्षा चालकाने वीज खांबावरील तारांना थेट ‘हुकिंग’ करून त्यातून वीज घेण्याची सोय केली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, हा प्रकार रात्री सुमारे अकरा वाजल्यापासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत सुरू असतो. म्हणजेच, दिवसभर रिक्षा चालवून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी चोरीच्या विजेवर चार्जिंगचा हा उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे महावितरणला आर्थिक फटका बसत असून प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवरच हा भार कालांतराने टाकला जातो. तसेच, अशा अवैध जोडण्यांमुळे वीजपुरवठ्यावर ताण येऊन परिसरातील पुरवठा खंडित होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, सार्वजनिक सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, एवढ्या उघडपणे वीज चोरी होत असताना संबंधित वीज कंपनीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष कसे? असा प्रश्नही समाज माध्यमांवर नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणी संबंधित रिक्षा चालकासह अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘हुकिंग’द्वारे वीज चोरी ठरू शकते जीवघेणी
वीज खांबावरून थेट ‘हुकिंग’ करून वीज घेणे हे केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायकही आहे. उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह वाहत असतो. अशा वेळी कोणतीही सुरक्षात्मक साधने न वापरता थेट तारांना स्पर्श केल्यास किंवा अवैध जोडणी करताना क्षणार्धात विजेचा तीव्र धक्का बसू शकतो. यामुळे गंभीर भाजणे, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा थेट मृत्यूही होऊ शकतो. तसेच, चुकीच्या पद्धतीने केलेल्या जोडण्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे आसपासच्या घरांना आणि नागरिकांना मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून वारंवार करण्यात येते.

