– पाच उल्लंघनानंतर कठोर कारवाई
नागपूर :- वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत महत्त्वपूर्ण बदल केले असून, यासंदर्भातील नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुधारित नियमांनुसार ई-चलान प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात आली असून, एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा अधिक उल्लंघने करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नव्या तरतुदीनुसार, वाहतूक उल्लंघनांची गणना संबंधित वर्षापुरतीच मर्यादित राहणार असून मागील वर्षातील उल्लंघने पुढील वर्षासाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यामुळे वारंवार नियम तोडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
ई-चलान प्रणाली अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस तसेच अधिकृत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चलान जारी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक निगराणी यंत्रणेद्वारे स्वयंचलित पद्धतीने चलान तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चलान ठरावीक मुदतीत पाठवणे बंधनकारक
नव्या नियमांनुसार, चलान जारी झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला ते १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष किंवा तीन दिवसांत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवणे बंधनकारक राहणार आहे. नागरिकांना चलानाची रक्कम ४५ दिवसांच्या आत भरण्याची किंवा आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन आक्षेप नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत आक्षेप नोंदवला नाही, तर चलान स्वीकारलेले मानले जाईल आणि पुढील ३० दिवसांत दंडाची रक्कम भरणे आवश्यक राहील. आक्षेप फेटाळल्यास संबंधित व्यक्तीला न्यायालयात दाद मागण्यासाठी चलानाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे.
सेवा व्यवहारांवरही निर्बंध
दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास वाहनाशी संबंधित विविध सेवा, परवाना व्यवहार किंवा इतर प्रशासकीय कामांवर निर्बंध येऊ शकतात. अशा वाहनांना ‘व्यवहार न करण्यायोग्य’ म्हणून नोंदवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या बदलांची व्यापक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांना वृत्तपत्र जाहिराती, जनजागृती मोहीम आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित नियमांमुळे वाहतूक शिस्त अधिक कडक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

