spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धक्कादायक प्रकार! शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अत्यंत गंभीर घटना

वर्धा २४ : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. शस्त्रक्रिया करून बेशुद्ध अवस्थेत ठेवलेल्या एका रुग्णाच्या संपूर्ण अंगावर मुंग्या चढल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चिचघाट (लाडकी) येथील या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुरुष आंतररुग्ण वॉर्डमध्ये हलवण्यात आले. यावेळी रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता. काही वेळातच रुग्णाच्या शरीरावर मुंग्या चढलेल्या आढळून आल्या. ही धक्कादायक बाब रुग्णासोबत उपस्थित असलेल्या मित्राच्या लक्षात आली आणि त्याने तत्काळ याची माहिती वॉर्डातील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर रुग्णाला तातडीने शस्त्रक्रिया कक्षात नेऊन त्याच्या शरीरावरून मुंग्या काढण्यात आल्या आणि त्याची स्वच्छता करण्यात आली. या प्रकारामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचा आणि रुग्णसंवेदनेचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे. इतकेच नव्हे तर रुग्णालय प्रशासनानेही परिसरात मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याची कबुली दिली आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची सुरक्षितता आणि आरोग्य सेवा याविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आधीपासूनच विविध वैद्यकीय सुविधा कमी असल्याच्या तक्रारी होत्या, आणि आता या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित घटनेची चौकशी सुरू असून, तपासात दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Popular Articles