Friday, May 1, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मंगल कार्यालये, रेस्टॉरंट व बारमध्ये अग्निशमन यंत्रणाबद्दल उत्पादन शुल्क विभागाकडून अहवाल मागवा

– सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे मनपा प्रशासनाला निर्देश

नागपूर :- शहरात 15 मीटरपेक्षा उंच इमारतीमध्ये सुरू असलेल्या मंगल कार्यालये तसेच रेस्टॉरंट व बारमध्ये पुरेशी अग्निशमन यंत्रणा आहे काय, अशी विचारणा मनपाच्या अग्निशमन विभागाने संबंधित विभागाला तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला करून 15 दिवसात अहवाल मागवावा, असे निर्देश सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला दिले आहेत.

मनपाच्या अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक आज (ता. 30) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात समितीच्या सभापती रुपाली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला समितीचे उपसभापती लखन येरवार, सदस्य तुषार लारोकर, अमोल शामकुळे, बाबाराव तायडे, संजय अवचट, प्रगती यादव, सिराज अहमद अंसारी व सायमा नाज फैयाज कुरेशी यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते व अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गर्दीच्या ठिकाणी तसेच मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित येत असलेल्या ठिकाणांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम आहे काय, याचा सविस्तर आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात शहरातील हॉस्पीटल, रेस्टॉरंट, बार, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये, शाळांच्या संचालकांनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला.

शहरात 15 मीटर पेक्षा कमी उंचीच्या इमारतींना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी 15 मीटर पेक्षा कमी उंचीच्या इमारतीच्या मालकांवर नोटीस बजावू नये परंतु त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीमध्ये सुरू असलेले मंगलकार्यालये तसेच रेस्टॉरंट व बारच्या संचालकांनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे काय व तेथे सक्षम यंत्रणा आहे काय, याची शहानिशा करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात मनपाच्या अग्निशमन विभागाने आस्थापनांच्या संबंधित विभागाकडून तसेच उत्पादन शुल्क विभागाला पत्र देऊन शहरात सुरू असलेल्या रेस्टॉरंट व बारमध्ये अग्निशमन यंत्रणेची सद्यस्थिती काय आहे, या संदर्भात अहवाल मागवावा. हा अहवाल येत्या 15 दिवसात देण्याचे निर्देश या नोटीसमध्ये द्यावे. ज्या रेस्टॉरंट व बारमध्ये अग्निशमन यंत्रणांचा अभाव आहे, त्यांचे परवाना रद्द करण्याचे पत्र देण्याची कारवाई करावी, असेही निर्देश बोरकर यांनी दिले.

नोटीस देताना दक्षता घ्या

एखाद्याने तक्रार केल्यानंतर अग्निशमन यंत्रणांचा अभाव असल्याबद्दल नोटीस देताना संबंधित अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ नोटीस देण्यापूर्वी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, असेही निर्देश सत्ता पक्षनेते श्री. बोरकर यांनी दिले. अग्निशमन अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित आस्थापनामध्ये आग लागून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्या इमारतीच्या मालकाला निश्चितपणे नोटीस बजावावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा व कोचिंग क्लासेससाठी अग्निशमन यंत्रणा अनिवार्य

शाळा, कोचिंग क्लासेस, हॉस्पीटल, मंगलकार्यालये, बार व रेस्टॉरंटच्या संचालकांना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे सभापती रुपाली ठाकूर यांनी स्पष्ट केले. या आस्थापनांमध्ये लहान मुले व मोठ्या संख्येने लोक राहत असल्याने काही धोका निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान व प्रसंगी जिवितहानी होण्याची शक्यता आहे. या आस्थापनांची अग्निशमन विभागाकडून पुन्हा तपासणी करावी. तेथे अग्निशमन विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण यंत्रणा लावण्याची सक्ती करावी. हा धोका ओळखून या आस्थापनांना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रे घेण्याची सक्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोरण तयार करावे

शहरातील इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी एक धोरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपसभापती लखन येरवार यांनी आवश्यकता व्यक्त केली. यासाठी अग्निशमन विभाग, नगररचना विभाग व आरोग्य विभागाने एकत्रित येऊन अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या संदर्भात एक व्यापक धोरण तयार करावे, असे सूचना केली.

शहरात जवळपास 650 हॉस्पीटलची नोंद मनपाच्या आरोग्य विभागाकडे असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. नवीन हॉस्पीटलला मान्यता देताना अग्निशमन यंत्रणांची पूर्तता केल्याची शहानिशा केली जाते. त्यासाठी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन विभाग यंत्रणा सज्ज

अग्निशमन विभागाकडे आग किंवा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्ण यंत्रसामुग्री असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बाराहाते यांनी सांगितले.

अग्निशमन विभागाने सज्ज असावे – नरेंद्र (बाल्या) बोरकर

नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी सज्ज राहावे, असे आवाहन सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केले आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना घडतात असतात. त्यामुळे अधिक लोकांचा संग्रह होत असलेल्या ठिकाणी लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एखादी आगीची घटना घडल्यानंतर तात्काळपणे कारवाई करून आग नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील सर्व अग्निशमन केंद्रातील जवानांनी व अधिकार्यांनी चोवीस तास सावध राहावे, असे आवाहन सत्तापक्ष नेते बोरकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.