Home Latest News भंडारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; विजयकुमार पुंडे यांच्यासह ११ जणांना ‘महासंचालक...

भंडारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; विजयकुमार पुंडे यांच्यासह ११ जणांना ‘महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

0
6

हंसराज, भंडारा :- महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनिय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये भंडारा जिल्हा पोलीस दलातील ११ अधिकारी व अंमलदारांनी बाजी मारली असून, जिल्ह्याचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या गौरवास्पद यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून जिल्हा पोलीस दलाची मान राज्यात उंचावली आहे.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी नियंत्रणात जे उल्लेखनीय योगदान दिले, त्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

विजयकुमार पुंडे यांच्या कामगिरीचा गौरव जिल्ह्याचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल हे मानाचे पदक जाहीर झाले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांचा तपास लावून प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व अंमलदार यावर्षी भंडारा जिल्ह्यातून सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अंमलदारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने: – पोलीस निरीक्षक: कृष्णकुमार तिवारी – सहायक पोलीस निरीक्षक: अनिल भिसे, अमरदास धंदर – पोलीस उपनिरीक्षक: विजयकुमार पुंडे, गणेश पडवार यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रेणीतील सात अंमलदारांचाही समावेश आहे. यात गंगाधर नागरीकर, सुभाष मस्के, मनोज चव्हाण, शिवशंकर निंबार्ते, सुधीर मडामे, प्रकाश गलुले आणि हरिदास रामटेके यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव पोलीस महासंचालकांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या या यशामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तसेच संपूर्ण जिल्ह्यातून या अधिकारी व अंमलदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मानाच्या पदकांमुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.