spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा तालुक्यात खळबळ! महाराष्ट्र दिनीच खोकरला ग्रामपंचायतीला कुलूप; झेंडावंदन न केल्याने ग्रामस्थांचा संताप

– दोषी सरपंच आणि ग्रामसेवकावर निलंबनाची टांगती तलवार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 हंसराज, भंडारा :- एककीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करत असताना, भंडारा तालुक्यातील खोकरला गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. १ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नाही, इतकेच नव्हे तर कार्यालयाला चक्क कुलूप असल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

नेमका प्रकार काय? आज १ मे, महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे बंधनकारक आहे. मात्र, खोकरला ग्रामपंचायत प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसून आले. ध्वजारोहणाच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे होते. तिथे ना सरपंच उपस्थित होते, ना ग्रामसेवक किंवा कोणताही कर्मचारी. झेंडावंदनासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने गावात संतापाची लाट उसळली.

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप हा प्रकार म्हणजे केवळ कामातील हलगर्जीपणा नसून राष्ट्रीय अस्मितेचा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. “ज्या दिवशी संपूर्ण देश आणि राज्य उत्साहात आहे, त्याच दिवशी लोकशाहीच्या कणा असलेल्या ग्रामपंचायतीला कुलूप असणे हे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

निलंबनाची मागणी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव या गंभीर प्रकरणाची दखल घेत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कर्तव्यकसुरी करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकाला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील काकड यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून, “जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा दिला आहे.

आता या प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles