spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ मुळे गोरगरीब रुग्णांना मिळणार लाभ

मानेवाडा यूपीएचसी मधील ‘किओस्क’चे आमदार मोहन मते यांच्या हस्ते लोकार्पण: ६५ पेक्षा अधिक चाचण्या मोफत

नागपूर, ता. २५  : नागपूर महानगरपालिकाद्वारे जिल्हा खनिज निधीच्या माध्यमातून मनपाच्या मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ उपलब्ध करण्यात आले आहे. या ‘किओस्क’ चे गुरुवारी (ता.२४) दक्षिण नागपूरचे आमदार  मोहन मते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मानेवाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटले, माजी नगरसेविका  मंगला खेकरे, ‘किओस्क’च्या संचालनाची जबाबदारी असलेल्या मयकर इनोव्हेशन प्रा.लि. चे  अभिषेक मयकर, मार्केटिंग आणि सेल्स प्रमुख पूजा गुप्ता आदी उपस्थित होते.

‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ मुळे मनपाच्या आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मोठी सुविधा निर्माण होणार आहे. आरोग्याशी संबंधित महागड्या चाचण्या अगदी काही मिनिटात निःशुल्क मिळणार असल्यामुळे आरोग्य सेवेमध्ये महत्वाचा पुढाकार ठरणार आहे, असे मत यावेळी आमदार मोहन मते यांनी व्यक्त केले.

मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांच्या सुविधेसाठी ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ ची सुविधा उपलब्ध करण्याबाबत आमदार  मोहन मते यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली. मनपा आयुक्तांनी व अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी देखील या विषयात विशेष लक्ष देऊन वेळोवेळी मशीनची पडताळणी केली. खासगी पॅथॉलॉजी लॅब मधील तपासणी अहवाल आणि ‘किओस्क’ मधील यातील समानता तपासल्यानंतरच या ‘किओस्क’ला परवानगी मिळाली. नागरिकांच्या सुविधेसाठी घेतलेला पुढाकार आणि आमदार  मोहन मते यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ उपलब्ध झाले आहे. या ‘किओस्क’च्या माध्यमातून अतिजोखमिच्या रुग्णांची देखील तपासणी केली जाईल, असे प्रतिपादन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.

मनपाच्या मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच दिघोरी, नंदनवन, बिडीपेठ, सोमवारी क्वाटर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय येथे देखील ‘डायग्नोस्टिक हेल्थकेअर किओस्क’ उपलब्ध करण्यात येणार आहे. या ‘किओस्क’च्या संचालनासाठी प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

६५ पेक्षा अधिक चाचण्या मोफत

मयकर इनोव्हेशन प्रा.लि. चे  अभिषेक मयकर यांनी मशिनच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. हे मशीन ६५ हून अधिक चाचण्यांचे निदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्यात १२-एलईडी ईसीजी, डिजिटल स्टेथोस्कोप, डर्मास्कोप, ऑटोस्कोप, एएनसी कॅमेरा आणि वेब कॅमेरा आहे. या मध्यामातून टेलिकन्सल्टेशन आणि लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील करण्याची सुविधा आहे. एचबीसी, मधुमेह, थायरॉईड, एचआयव्ही, युरीन टेस्ट, किडनी टेस्ट, युरिक अॅसिड, कोव्हिड, हापेटाइट्स आणि गर्भधारणा चाचण्या या सारख्या ६५ पेक्षा अधिक चाचण्या करण्यात येतात.

Popular Articles