spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान व मका खरेदी मर्यादेत घसघशीत वाढ

– खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; पणन विभागाचे सुधारित आदेश जारी

हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या खरेदी मर्यादेत वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य करत, पणन विभागाने अखेर नवीन आदेश जारी केला आहे. नव्या निर्णयानुसार, आता धान खरेदीची मर्यादा हेक्टरी ४५ क्विंटल, तर मका खरेदीची मर्यादा हेक्टरी ५५ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी खरेदी मर्यादा वाढवून मिळावी यासाठी आग्रही होते. वाढलेले उत्पादन आणि शेतीचा खर्च पाहता, जुनी मर्यादा शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत होती. अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन शिल्लक राहून ते वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र आणि राज्य स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी या प्रश्नावर केवळ लोकसभेतच आवाज उठवला नाही, तर मतदारसंघातही विविध आंदोलने, निवेदने आणि प्रशासकीय बैठकांद्वारे सरकारवर दबाव निर्माण केला होता. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम आणि उत्पादनाला पूर्ण बाजारपेठ मिळावी, ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पणन विभागाने नमते घेत खरेदी मर्यादेत वाढ करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

शेतकरी संघटनांकडून निर्णयाचे स्वागत या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पादन आता सरकारी खरेदी केंद्रांवर सामावले जाणार असून, त्यांना हमीभावाचा लाभ मिळणार आहे. शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “हा निर्णय उशिरा आला असला तरी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे आणि खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रयत्नांचे हे मोठे यश आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

प्रशासनाला पारदर्शक खरेदीचे आदेश दरम्यान, पणन विभागाच्या या नवीन पत्राची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना सर्व खरेदी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी आणि कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.एकूणच, खरेदी मर्यादा वाढल्याने जिल्ह्यातील रब्बी हंगामातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.