– रास्त भाव दुकानदारांकडे केरोसीन पोहोचले का नाही ?
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- सरकारने गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ३ लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरात त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहण्याची चिन्हे आहे. अपुऱ्या यंत्रणा आणि सात जिल्ह्यांचा पुरवठा संशयास्पद पद्धतीने एका वितरकावर सोपविल्याने वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्यासाठी तब्बल १२० कि.ली. केरोसीन मंजूर केले आहे. मात्र, या निर्णयानंतरही रामटेक तालुक्यात अद्याप प्रत्यक्ष वाटप सुरू झालेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन देण्याचे निर्देश देण्यात आले असून, अंत्योदय (एएवाय ) व प्राधान्य (पीएचएच ) शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही रामटेक तालुक्यातील गावांमध्ये केरोसीन उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतरही तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांकडे केरोसीन पोहोचलेले नाही. काही ठिकाणी वितरणाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शासनाने केरोसीनचे संपूर्ण वितरण ४५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच वितरण साखळी सुरळीत ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. तरीही रामटेक तालुक्यातील विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ४५ दिवसांत केरोसीनची उचल व वितरण पूर्ण करण्याचा स्पष्ट उल्लेख असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. केरोसीनचा गैरवापर रोखण्यासाठी कडक नियम लागू असले तरी, वितरणच न झाल्याने सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
प्रक्रिया सुरू आहे संबंधित ऑइल कंपनीकडून तालुक्यात अद्यापही केरोसीनचा पुरवठा आलेला नाही. आमच्याकडे पुरवठा आल्यानंतर तालुक्यातील रास्त भाव दुकानांपर्यंत केरोसीन पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार वाटप करण्यात येईल.
– संदेश हलमारे (निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग रामटेक)