हंसराज, लाखनी (जि. भंडारा) :- ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून, कार्यालयाला कुलूप लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लाखनी तालुक्यातील सावरी (मुरमाडी) येथील ९ जणांविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भिकाराम बागडे (वय ४५), मंगेश धांडे (वय ३६), मोहन रेहपाडे (वय ४५), आदित्य बागडे (वय ३२), एक महिलाआरोपी (वय ४५), दुसरी महिला आरोपी (वय ५५), विनोद चाचेरे (वय ४८), संजय वंजारी (वय ५६) आणि विनोद चकोले (वय ४५, सर्व रा. सावरी/मुरमाडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सावरी/मुरमाडी ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ घातला.
या आरोपींनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बळजबरीने कार्यालयाबाहेर काढले आणि कार्यालयाला कुलूप लावून दिले. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन शासकीय काम करण्यापासून रोखण्यात आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत पंचायत समिती लाखनीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात संबंधित ९ जणांनी केलेले कृत्य सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
या अहवालाच्या आधारे ग्रामपंचायत अधिकारी (विस्तार अधिकारी) संगीता वसंत मारवाडे (वय ४१, रा. खैरलांजी, ता. साकोली) यांनी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक २३५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२१, १८९(२), १२६(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बोरकर करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.