spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अकोल्यासह राज्यातील १० नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन

अकोला :- राज्यातील वैद्यकीय सेवा सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी केली जाणार असून तीन हजार ७०८ कोटींचे अर्थ सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्या अंतर्गत अकोल्यासह राज्यातील राज्यातील १० नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा बळकट केली जाणार आहे.

उपक्रमांतर्गत आरोग्य व्यवस्थापन प्रणाली

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत सध्याच्या शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक निदान यंत्रणा अधिक सक्षम करणे विशिष्ट आजारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणे, नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांची स्थापना करून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सहाय्य करणे आदींचा समावेश आहे.

नव्या महाविद्यालयांमध्ये आरोग्य सुविधा

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. याशिवाय जळगांव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदूरबार व गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये १०० प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली. या वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरिता तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, याकरिता ‘स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलीव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम ॲण्ड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून तीन हजार ७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

अस्तित्वातील महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन, तर नव्यांची उभारणी

प्रकल्पात वर्धा, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसेच मुंबईतील जीटी, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी, पालघर, धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. बारामती, सांगली (मिरज), कोल्हापूर येथील नर्सिंग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय अहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, नाशिक, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी, वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रूग्णालय व्यवस्थापन व प्रशासन मानवसंसाधन विकास यांच्या क्षमता वृध्दीसाठी तरतूद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.