spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अजिंठा पर्यटनाची कोंडी; महिनाभरात तब्बल ३८ वेळा वाहतूक ठप्प

छत्रपती संभाजीनगर :- जागतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या अजिंठा लेणीकडे जाताना गेल्या महिनाभरात तब्बल ३५ ते ३६ वेळा वाहतूक अडकली. कमालीच्या संथ वेगाने कधी दीड तास तर कधी दोन तासांपर्यंत प्रवासी आणि पर्यटक अडकलेले असतात. गेली अनेक वर्षे अजिंठा रस्ता अपूर्ण स्थितीमध्ये असताना आता लेणी परिसरातील व्ह्यू पॉईंटवर व्यापारी संकुलाच्या प्रस्तावावर नुकतीच चर्चा करण्यात आली. मंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती असते.

अजिंठा आणि फर्दापूर या दोन गावांमध्ये असणाऱ्या घाटात एकदा गाडी बंद पडली आणि ती मालमोटार असलीच तर वाहतूक मुंगीच्या पावलाने चालते. वाहन बाजूला करून रस्ता मोकळा करण्यासाठी किमान दीड तासाचा वेळ लागतो. ताेपर्यंत वाहतूक थांबते. अजिंठा आणि फर्दापूर या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये जेमतेम ३० ते ३२ कर्मचारी असून, सुटी व रजा वजा जाता दररोज केवळ २२ कर्मचारी उपलब्ध असतात. वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे पोलिसांचा बहुतांश वेळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी द्यावा लागतो.

अजिंठा पोलीस ठाण्याचे प्रभारी अमोल धाकणे यांच्या मते, घाटात एखाद्या गाडीचे इंजिन खराब झाले किंवा अपघात झाला तर वाहतूक कोंडी होते. घाटात नादुरुस्त वाहन उभे करण्यासाठी अतिरिक्त जागा नाही. क्रेन आणून वाहन काढेपर्यंत बराच वेळ जातो. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांच्या विमान आणि रेल्वेच्या प्रवासावर परिणाम होतो. यामुळे आता अनेक टूर ऑपरेटर्स आपल्या सहलीच्या नियोजनातून अजिंठा वगळण्याच्या मानसिकतेत असतात. रस्ता रुंदीकरण हा या समस्येवर कायमस्वरूपी उपाय असल्याची चर्चा असली तरी असा कोणताही प्रस्तावच तयार नसल्याचे वन अधिकारी सांगतात. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून दोन पोलिसांची विशेष नियुक्तीही करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीतून अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नुकतीच मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्येही यावर चर्चा झाली. मधमाशांचे पोळे तज्ज्ञांच्या मदतीने अन्यत्र हलवता येऊ शकतात का, परिसरात चेतावणी फलक लावावेत तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही होत आहे. आमदार सत्तार यांनीही अशी मागणी केली. मात्र, वाहतूक समस्या वगळून अजिंठा लेणीचे विहंगम दृष्य ठिकाण असणाऱ्या भागात व्यापारी संकुल उभे करण्याची मागणी पुढे रेटली जात आहे. या भागातील ७०० एकरावरील विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.