हंसराज, भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 8 ते 22 मे 2026 या कालावधीत सकाळी 6.00 ते 8.00 वाजता व सायंकाळी 5.00 ते 7.00 वाजता पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने हॉकी, जिम्नॅस्टीक, कनोईंग कया किंग, बुद्धीबळ, हॅण्डबॉल, कुस्ती, फुटबॉल, कराटे, बास्केटबॉल, धनुर्विद्या, सॉफ्टबॉल, बेसबॉल, वुशू, टेनिक्वाईट, खो-खो इत्यादी खेळ प्रकाराचा समावेश राहणार आहे.
संबंधित खेळाचे तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगिण विकास साधन्याचा प्रयत्न राहणार आहे. सदर शिबिराद्वारे खेळाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. तरी भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.