नागपूर, दि २५ : सोयाबीन, कापूस, तूर पीकांचे बहुभक्षीय हुमणी अळीपासून (होलोट्रीचीया प्रजाती) नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून किड व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आला आहे.
हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान होते. सातत्याने ही किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूलिंब आणि बोर यासारख्या झाडांवर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 3 आठवडयांनी करावी असे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
हुमणी अळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफुल आदी पीकांची मुळे ही अळी फस्त करतात याकारणाने पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. या किडीचा सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवश्यक असते.
लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरिता फिप्रोनील 40 टक्के इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दानेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे. किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार 33.30 किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.








