spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस म्हणतात २५ बळी, महापालिका म्हणते शून्य!

– नागपुरात उष्माघाताच्या मृत्यूंवरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये जुंपली

नागपूर :- उष्णतेच्या वाढत्या तडाख्यात शहरातील उष्माघाताच्या मृत्यूंच्या आकडेवारीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. नागपूर शहर पोलिसांनी उष्णतेमुळे सुमारे २५ जणाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने एकाही उष्माघाताच्या मृत्यूची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात उष्माघाताचे मृत्यू किती आणि खरे कारण काय, याबाबत संभ्रम आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ मार्च ते ५ मे २०२६ या काळात शहरातील आरोग्य केंद्रे, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये २ लाख ७७ हजार ७३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ६५ रुग्णांमध्ये उष्णतेशी संबंधित लक्षणे आढळली. यात १४ रुग्णांना उष्णतेमुळे स्नायूंचा त्रास, २६ जणांना त्वचेवरील पुरळ, १९ जणांना थकवा व अशक्तपणा, तर ६ जणांना चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याची लक्षणे दिसून आली. ही सर्व प्रकरणे सौम्य स्वरूपाची असल्याने ते उष्णाघातात मोडत नाही. तर शहरात अद्याप एकही उष्णाघाताचा संशयित मृत्यूही नसल्याचा महापालिकेचा दावा आहे. दुसरीकडे, शहर पोलिसांनी ‘मिशन मुक्ती ३’ अभियानाच्या प्रसिद्धीपत्रकात उष्णतेमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. दोन्ही विभागांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये उष्णाघातासारख्या गंभीर मुद्यावर समन्वय आहे काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२५ पासून शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन मुक्ती’ अभियानातून आतापर्यंत ४८२ जणांना मृत्यूच्या दारातून परत आणल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, या व्यक्तींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करून नंतर महापालिकेच्या निवारा केंद्रात हलवण्यात आले. पदपथावर राहणारे बेघर, गरीब, भिक्षेकरी आणि मानसिक आजारांनी त्रस्त नागरिकांसाठी ही मोहीम जीवनदायी ठरत आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन मुक्ती’ एकीकडे दिलासा देत असताना, मृत्यूंच्या आकडेवारीवरील विसंगतीमुळे शहरातील विविध विभागांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेचा दावा काय?

नागपूर शहरात एकाही उष्माघातग्रस्त रुग्णाची किंवा संशयित मृत्यूची नोंद नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. मेडिकल व मेयो रुग्णालयात शवविच्छेदन झालेल्या १५ बेघर नागरिकांबाबत विचारणा केली असता, त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, संबंधित रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांनीही अद्याप एकही उष्माघाताचा रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले, असा दावा आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.