spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्रातील कासवाचे परदेशात पर्यटन

– १८०० किमी प्रवास करून पुन्हा मायदेशी

मुंबई :- समुद्रात राहणाऱ्या जीवांची दुनिया ही अनेक साहसी प्रवासांची असते. कासव हजारो किलोमीटर प्रवास करतात. कासवाच्या पाठीवर ‘सॅटेलाईट टॅग’ बसविण्यात आल्यामुळे त्याच्या प्रवास मार्गाचा उलगडा होतो. अनेकदा राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावरील कासवे दूर प्रवास करून पुन्हा आपल्या मूळ स्थानी येतात. नुकताच पालघरच्या डहाणू येथून सोडलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ या प्रजातीच्या मादी कासवाने गुजरातमार्गे ओमनपर्यंत प्रवास करून पुन्हा रत्नागिरीचा किनारा गाठल्याचे निदर्शनास आले आहे.

डहाणू येथील सागरी उपचार केंद्रात एका मादी कासवावर तीन महिने उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती व्यवस्थित असल्याची खात्री केल्यानंतर तिला खोल समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजी या कासवाच्या पाठीवर ‘सॅटेलाईट टॅग’ बसविण्यात आला आणि तिला ‘धवललक्ष्मी’ असे नाव देण्यात आले. त्याच दिवशी धवललक्ष्मीला खोल समुद्रात सोडण्यात आले. काही दिवस ती गुजरात येथील समुद्रात असल्याचे सॅटेलाईट टॅगवरील नोंदीच्या आधारे स्पष्ट झाले होते.

ओमनच्या दिशेने प्रवास…

काही दिवस गुजरातजवळील समुद्रात घालविल्यानंतर धवललक्ष्मीने समुद्रात पश्चिम दिशेने प्रवास सुरू केला. तिने २५ फेब्रुवारीपर्यंत १८०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला. तेव्हा ती ओमनच्या समुद्रकिनाऱ्यापासून ५०० किमी अंतरावर होती. ओमन समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेला हा परिसर कासवांच्या प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. डहाणू- गुजरात आणि नंतर ओमनच्या दिशेने प्रवास करणारी धवललक्ष्मी अरबी समुद्राच्या मध्यावर ३८० मीटर खोलीपर्यंत आत जाऊन आल्याची नोंद करण्यात आली.

रत्नागिरीकडे प्रस्थान…

साधारणपणे मार्चमध्ये धवललक्ष्मीने पुन्हा दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू केला. यादरम्यान ३० मार्चच्या सुमारास तिने आपला प्रवास काहीसा संथ केल्याची नोंद झाली. यामुळे आता ती कोणत्या दिशेने प्रवास करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. ज्या क्षेत्रात अन्नसाठा मुबलक असतो, अशा ठिकाणी कासव काही वेळ थांबून पुन्हा प्रवास सुरू करतात. जगभर कासवांचे प्रवासमार्ग हे अन्नसाठा, जैवविविधता यावर अवलंबून असतात. ९ एप्रिलपासून दक्षिण दिशेला प्रवास करत धवललक्ष्मी २० एप्रिलपर्यंत रत्नागिरीपासून सुमारे ८०० किमीवर असल्याची नोंद झाली आहे. उत्तर कोकणातील डहाणू येथून धवललक्ष्मीचा प्रवास सुरू झाला होता. आता ती पुन्हा कोकण किनारीपट्टीवर येऊन पोहोचली आहे. येथून पुढे ती कोणत्या दिशेला प्रवास करते, पुन्हा दक्षिणे दिशेला श्रीलंकेकडे जाते का याबद्दल सर्वांनाच उत्सूकता आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.