– अमरावतीची तहान कंत्राटदारांच्या संपाच्या कात्रीत…
अमरावती :- कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या अमरावतीकरांवर आता ‘कृत्रिम’ जलसंकट ओढवले आहे. गुरूवारी दुपारी डवरगाव नजीक अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जुनी जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प झाला आहे. विशेष म्हणजे, थकित देयकांसाठी कंत्राटदारांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे दुरूस्तीच्या कामात खोळंबा निर्माण झाला असून आगामी दोन दिवस अमरावतीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
नेमकी घटना काय?
अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरिका डवरगाव परिसरात दुपारी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी शेतात शिरले असून पाण्याचा मोठा अपव्यय झाला आहे. ही मुख्य जलवाहिनी असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
दुरूस्तीसमोर संपाचा अडसर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कंत्राटदारांनी आणि प्रलंबित मागण्यांसाठी आणि थकित देयकांसाठी सध्या कामबंद आंदोलन पुकारले आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर प्रशासनाने दुरूस्तीसाठी कंत्राटदारांना विनंती केली. मात्र, थकित देयकांचे लेखी आणि ठोस आश्वासन मिळेपर्यंत कामाला हात लावणार नाही, अशी आक्रमक भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये चर्चा सुरू आहे. कंत्राटदारांची मनधरणी केली जात आहे. सध्या प्रशासकीय कोंडी आणि तांत्रिक बिघाड अशा दुहेरी पेचात जीवन प्राधिकरणाचे प्रशासन अडकले आहे. अमरावती शहरात मजीप्राची विविध कामे सुमारे ३५ ते ४० कंत्राटदारांकडून केली जातात, मात्र गेल्या वर्षभरापासून देयके रखडल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.
पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार?
कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने काम सुरू केले, तरी जलवाहिनीची दुरूस्ती आणि त्यानंतर दाबाने पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी किमान शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवस पाणीटंचाई
डवरगाव येथे दुपारी जुनी वितरीका फुटल्याने अमरावती शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हा दोष दुरूस्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून संपकर्त्या कंत्राटदारांना विनवणी करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्या प्रलंबित असून त्यांना ठोस आश्वासन हवे आहे.त्यासाठी वरीष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येत असून पेच सुटेल अशी अपेक्षा आहे.दरम्यान अमरावतीकरांना ८ आणि ९ मे रोजी पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती मजिप्राचे कार्यकारी अभियंता संजय लेवरकर यांनी दिली आहे.