spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनगणना आणि SIR च्या कामामुळे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक बदलले

वर्धा :- जनगणनेचे महत्वाचे काम सोपविले. त्यातच शिक्षक प्रशिक्षण व SIR हे तपासणीचे काम आल्याने करायचे काय व कसे असा पेच राज्यातील शिक्षकवर्गास पडला होता. भर उन्हाळ्यात पायपीट करीत जनगणना कार्य करण्याची मानसिकता शिक्षकांनी ठेवली. पण तीनही कामे करण्याची बाब जोखमीची ठरणार असल्याची चीड व्यक्त झाली. अखेर सरकारने आता मार्ग काढला आहे.

तारखा बदलल्या

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे संचालक डॉ. हेमंत कुमार वसेकर यांनी काढलेल्या केलेल्या पत्रानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणाच्या तालुकास्तरीय तारखा जनगणनेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी कुटुंब गणनेचे काम १६ मे पासून ते १४ जून पर्यंत केले जाणार आहे. जनगणनेच्या कामकाजासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील जवळपास सर्वच शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेले आहे.

शिक्षक प्रशिक्षण

दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याच कालावधी दरम्यान शिक्षकांच्या प्रशिक्षणाची नियोजन केले होते. शिक्षकांचे प्रशिक्षण हे जनगणनेच्या कालावधीत येत असल्याकारणाने शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे केली होती. तसेच याबाबत राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना संचालकांकडे सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पत्र देऊन आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जनगणनेच्या कालावधीतील प्रशिक्षण पुढे ढकलण्याबाबत मागणी करण्यात आली होती.‌ या संबंधाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे अधिकारी आणि राज्य जनगणना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये निर्णय होऊन शिक्षक प्रशिक्षणाचा तालुकास्तरीय कार्यक्रम सद्यस्थितीत पुढे ढकलण्यात आला आहे.

राज्यमंत्री बैठक

२९ एप्रिल रोजी मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांचे अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी जनगणनेच्या कालावधीतील नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आणि वरिष्ठ निवड समितीचे प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी याबाबत शिक्षण विभागाला प्रशिक्षण कार्यक्रमात बदल करण्याची निर्देश दिले होते. निवडणूक आयोग ( Election Commission of India ) द्वारे राज्यात मतदार यादी पडताळणी ( SIR ) चे सर्वेक्षण BLO म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सूरू झाले आहे. त्यात जनगणना व प्राथमिक शिक्षकांसाठी नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण असे तिहेरी कार्य ठराविक कालावधीत करायचे ठरले. पण ते अडचणीचे ठरणार म्हणून शिक्षकांचे प्रशिक्षण रद्दच करण्याचा सूर उमटला. अखेर शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यात पुढाकार घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.