– विकास कामांमुळे गैरसोय वाढली
नागपूर :- गोंदिया-नागपूर मार्गावरील विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नागपूरहून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस गुरुवारी तब्बल तासभर उशिराने सुटली. त्यातच अजनी स्थानकावरील शेड हटविल्याने मुसळधार पावसात शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
विकासकामांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
गोंदिया-नागपूर मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे ३ मे ते २३ मेदरम्यान विदर्भ एक्सप्रेसचा गोंदिया ते नागपूर दरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी सध्या नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता मुंबईकडे रवाना केली जात आहे. नागपूर, अजनी आणि परिसरातील प्रवाशांसाठी विदर्भ एक्सप्रेस ही मुंबईकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची रेल्वेगाडी मानली जाते. रोज शेकडो प्रवासी या गाडीने प्रवास करतात. मात्र गुरुवारी गाडी नियोजित वेळेत सुटू न शकल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वेळेवर माहिती न मिळाल्याने संताप
नियमित वेळापत्रकानुसार विदर्भ एक्सप्रेस सायंकाळी ५.०५ वाजता अजनी स्थानकावर पोहोचते आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे मार्गस्थ होते. मात्र गुरुवारी नागपूर स्थानकावरूनच गाडी उशिराने सुटली. गाडी विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून वेळेत देण्यात आली नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. परिणामी अनेक प्रवासी नियोजित वेळेनुसार अजनी स्थानकावर पोहोचले होते. दरम्यान, सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय झाली. फलाटावर गाडीची प्रतीक्षा करत असताना अनेक प्रवासी संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “गाडी उशिराने येणार असल्याची माहिती आधी दिली असती, तर आम्ही इतका वेळ पावसात थांबलो नसतो,” अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केली.
शेड हटवल्याने प्रवाशांचे हाल
अजनी स्थानकावर सध्या विकासकामे सुरू असल्याने अनेक ठिकाणचे शेड हटविण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटावर थांबलेल्या प्रवाशांना पावसापासून कोणतेही संरक्षण मिळू शकले नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवास करणारी कुटुंबे आणि हातात मोठे सामान असलेले प्रवासी विशेषतः त्रस्त झाले. काही जणांनी तिकीट खिडकी परिसरात आसरा घेतला, तर काही प्रवासी जिन्याखाली उभे राहताना दिसून आले. पावसामुळे फलाटावर पाणी साचल्याने प्रवाशांना हालचाली करतानाही अडचणी निर्माण झाल्या. काही प्रवासी ओले कपडे आणि सामान सांभाळत गाडीची वाट पाहत होते.
प्रवाशांकडून तात्पुरत्या सुविधांची मागणी
पावसाळ्याच्या तोंडावर शेड हटविल्याबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. “विकासकामे आवश्यक आहेत; मात्र प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये. पावसाळ्यापूर्वी किमान तात्पुरत्या शेडची व्यवस्था करायला हवी होती,” अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली.