spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उद्घाटनापूर्वीच सती नदीवरील पुलाला भेगा

– राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा वादात…

गडचिरोली :- गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कुरखेडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या मार्गावरील सती नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भेगा पडल्याने, हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आम आदमी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

‘आप’ने केलेल्या दाव्यानुसार या महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असल्याने प्रवाशांना प्रचंड धूळ आणि वाढत्या अपघातांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट साहित्य आणि तांत्रिक चुकांमुळे कामाचा दर्जा कमालीचा खालावला असल्याचे उघडपणे दिसत असतानाही, संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. प्रशासन या कंत्राटदाराचे इतके लाड का करत आहे, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांनी उपस्थित केला आहे.

सती नदीवरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. तत्पूर्वी पडलेल्या भेगांनी बांधकामाच्या गुणवत्तेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. कोट्यवधी खर्च करून जनतेच्या नशिबी पुन्हा निकृष्ट बांधकाम येत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या पुलाच्या बांधकामात वापरलेले सिमेंट, लोखंड आणि रेती या सर्व साहित्याची प्रयोगशाळेत तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, महामार्ग आणि पुलाच्या कामाची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, संबंधित कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी, सचिव अमृत मेहेर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.