यवतमाळ :- गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या दाहकतेने होरपळणाऱ्या जिल्ह्याला आज निसर्गाच्या अवकाळी रूपाचा प्रत्यय आला. आज गुरुवारी दुपारी अचानक वातावरण बदलले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी उमरखेड तालुक्यात वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले. या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दोघे गंभीर
उमरखेड तालुक्यातील शिवाजीनगर दराटी येथील श्रीनिवास देविदास राठोड (३२) हा तरुण आपले मळणीयंत्र घेऊन शेतमालक नंदाबाई जीवन आडे यांच्या शेतात ज्वारी काढण्यासाठी गेला होता. दुपारी २:३० च्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी श्रीनिवासने जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. त्याच्या मागोमाग नंदाबाई आडे (३८) व त्यांचा मुलगा यश आडे (१७) हे देखील तिकडे धावले. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत श्रीनिवास राठोड हा जागीच ठार झाला, तर नंदाबाई आणि यश हे दोघे गंभीररीत्या भाजले गेले. जखमींना तातडीने किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मुक्या प्राण्यांनाही फटका
उमरखेड परिसरातील खंड नंबर एक मध्येही निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. हिरामण भुजंगा दुधेवार यांच्या शेतात असलेल्या पाच वर्ष वयाच्या म्हशीवर वीज पडल्याने ती जागीच ठार झाली. यामुळे या गरीब शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उन्हापासून सुटका, पण बळीराजा संकटात
एप्रिलपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे यवतमाळचा पारा ४५ अंशांवर गेला होता. आजच्या पावसाने तापमानात ४ ते ५ अंशांची घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, हा आनंद शेतकऱ्यांसाठी चिंतेचा ठरला आहे. जिल्ह्यातील उन्हाळी मूग, भुईमूग, तीळ आणि फळबागांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी आंबे आणि लिंबूंची गळती झाली असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. बाजार समित्यांमध्ये उघड्यावर असलेला शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
यवतमाळसह उमरखेड व इतर तालुक्यात दुपारी पावसाने थैमान घातले. हवामान विभागाने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावीत. वीज चमकत असताना विसरूनही झाडाखाली उभे राहू नये, उलट सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांना आदेश दिले आहेत.