नागपूर :- अपघात प्रकरणाच्या तपासादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांशिवाय रात्री उशिरा महिलेच्या घरात प्रवेश केल्याचा आरोप झाल्यानंतर खापा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली.
याचिकाकर्त्या खुशबू इद्द्रिश खान यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, 25 जानेवारी रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता पोलीस त्यांच्या घरी आले होते. त्या वेळी त्या घरी एकट्याच होत्या. पोलिसांनी वॉरंट, लिखित आदेश किंवा BNSS नोटीस न दाखवता घरात प्रवेश करून चौकशी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. तसेच मोबाईल जप्त करताना पंचनामा किंवा पावती देण्यात आली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याची बाब मान्य केली. या चुकीबद्दल पोलिसांनी बिनशर्त माफी मागितली असून भविष्यात अशी घटना घडणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाला दिले.
दरम्यान, पोलिसांनी काही आरोप फेटाळले असून मोबाईल पंचांच्या उपस्थितीत जप्त केल्याचा दावा केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सिद्धांत घट्टे यांनी बाजू मांडली.