हंसराज,भंडारा लाखनी :- लाखनी तालुक्यातील बोरगाव येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास अवघ्या २४ तासांत लावून लाखनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला ६९ हजार ६२ रुपये किमतीचा संपूर्ण सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रेयस जगदीश निर्वाण (वय २२, रा. बोरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी विक्रांत गोपीचंद निर्वाण (वय ३६, रा. बोरगाव) हे ३ मे २०२६ रोजी सायंकाळी आपल्या पत्नी व मुलांना सासुरवाडीला (मौजा मिरेगाव) सोडण्यासाठी गेले होते. त्या रात्री ते सासुरवाडीलाच मुक्कामी थांबले. ४ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घराची पाहणी केली असता, बेडरूममधील लोखंडी आलमारी उघडी असून त्यातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, चांदीच्या ५ अंगठ्या, चांदीचा करदोळा आणि ५ चांदीचे कडे असा एकूण ६९,०६२ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.
विक्रांत निर्वाण यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१ (४) अन्वये गुन्हा (अपराध क्र. २३२/२०२६) नोंदवला. ठाणेदार सुभाष बारसे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला (डी.बी. पथक) तपासाचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक बाबी आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातील संशयीत तरुणांची चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान, संशयीत श्रेयस निर्वाण हा भंडारा येथे दागिने विक्री करण्यासाठी गेल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी भंडारा बसस्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
तपास पथकाची कामगिरी ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलीस हवालदार वच्छला चाचेरे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सार्वे आणि शुभम फंदे यांनी केली आहे. अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल लाखनी पोलिसांचे कौतुक होत आहे.