spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रलंबित प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी रोहित पवारांचा एल्गार; ९ सप्टेंबरला मोहाडीत ‘धडक मोर्चा’

– शेतकरी, महिला व बेरोजगारांच्या २५ मागण्यांसाठी तहसीलवर धडकणार जनसागर

हंसराज, मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि सामान्य जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी भव्य ‘धडक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा मोर्चा मोहाडी येथील चौंडेश्वरी माता मंदिरातून सकाळी ११ वाजता सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

२५ मागण्यांचा पाढा वाचणार या मोर्चाच्या माध्यमातून एकूण २५ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस तात्काळ देणे, २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीतील पात्र पण वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे आणि ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित जमा करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

सामान्यांच्या हितासाठी लढा केवळ शेतीच नव्हे, तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून पात्र महिलांना लाभ देणे, निराधार व वृद्धांची प्रलंबित पेन्शन जमा करणे, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखणे आणि मोहाडी नगरपंचायतीची जाचक कर आकारणी रद्द करणे, अशा जनहिताच्या प्रश्नांवर या मोर्चातून आवाज उठवण्यात येणार आहे.

हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

मोर्चाचे नियोजन

  – स्थळ : चौंडेश्वरी माता मंदिर ते तहसील कार्यालय, मोहाडी.

  – दिनांक : बुधवार, ९ सप्टेंबर २०२६.

  – वेळ : सकाळी ११:०० वाजता.

  – नेतृत्व : आमदार रोहित पवार.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.