Ø उमरखेड तालुक्यातील 32 गावांना दिलासा;
Ø पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना
Ø नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
यवतमाळ :- इसापूर धरण प्रकल्पातून यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडल्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील 32 पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.
या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यासाठी 9 दलघमी आणि नांदेड 3 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार इसापूर धरणामधून थेट पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र विमोचक उपलब्ध नसल्यामुळे नियमित कालवा आवर्तनाच्या वेळापत्रकाशी संलग्न अशा विमोचकाद्वारे दि. ५ एप्रिलपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दि. ११ मे अखेर एकूण १२ दलघमी मागणीपैकी ६.८१ दलघमी इतके पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आले असल्याची माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
उमरखेड तालुक्यातील टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, ऊंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर आदी गावांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.तसेच नांदेड जिल्ह्यातील 25 गावांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाने ग्रामस्थांना पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कालवा किंवा नाल्यातून बेकायदेशीर पाणी उपसा (पंपिंग) करू नये आणि पाण्याची नासाडी टाळावी, जेणेकरून सर्व गावांना समप्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी टंचाई निवारणासाठी जलसंपदा विभाग कटिबद्ध असून उर्वरित पाण्याचे नियोजनही वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.