मुंबई :- अकरावी प्रवेशाच्या शून्य फेरीसाठी प्रवेश अर्ज भरताना पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक कारणांमुळे प्रवेश प्रक्रियेत खोडा निर्माण झाला. संकेतस्थळ सुरू न झाल्याने विद्यार्थी व पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. साडेअकराच्या सुमारास संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले.
अकरावी प्रवेश परीक्षेच्या शून्य फेरीसाठी सोमवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज भरण्यास बुधवारपर्यंत ( १३ मे ) मुदत देण्यात आली आहे. मात्र सोमवारी सकाळी अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी संकेतस्थळ सुरू होत नव्हते, तर कधी प्रक्रिया पुढेच सरकत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. अखेर साडेअकराच्या सुमारास संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.