– अग्निशमन व विद्युत विशेष समितीच्या सभापती रुपाली ठाकूर यांचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. 13) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी विद्युत विभागाशी संबंधित विविध विषयांवर करण्यात आलेल्या चर्चेची सविस्तर माहिती पुढील बैठकीत तपशीलवार सादर करण्यासह, विद्युत विभागांचे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना सभापती रुपाली ठाकूर यांनी दिले.
बैठकीत उपसभापती लखन येरवार, समिती सदस्य तुषार लारोकर, अमोल शामकुळे, बाबाराव तायडे, सिराज अहमद अन्सारी, संजय अवचट, समिती सदस्या प्रगती यादव, सायमा नाज फैयाज कुरेशी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.![]()
यावेळी सभापती रुपाली ठाकूर यांनी विद्युत विभागाशी संबंधित जी कामे कंत्राटदारांना दिली आहेत, ती विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावीत आणि कामांना विलंब होत असल्यास त्यांना नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत केंद्र शासनाकडून ट्रॅफिक सिग्नल साठी मिळालेला निधी, कामांची सद्यस्थिती, वर्क ऑर्डर, आयआयटीएमएस प्रकल्पाची कामे, एमएसईबी खांब स्थलांतराची स्थिती, पथदिव्यांची देखभाल तसेच विद्युत विभागाशी संबंधित भंगाराचा लिलाव याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड यांनी समितीला दिली.
तर उपसभापती लखन येरवार यांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे एमएसईबीचे विद्युत खांब काढून त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मनपाद्वारे विद्युत खांब लावण्याच्या सूचना दिली. विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना इतर विभागाच्या जबाबदारीतून मुक्त करून त्यांना मूळ पदावर कार्य करू द्यावे, जेणेकरून ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करतील, अशा ही सूचना येरवार यांनी दिली. यावेळी समिती सदस्य सिराज अहमद अन्सारी यांनी झोपडपट्टी व आवश्यक ठिकाणी नवीन विद्युत खांब बसविण्यासह खांबाच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या. प्रत्येक झोनमध्ये चेकर्स ची संख्या वाढविण्याची सूचना समिती सदस्य अमोल शामकुळे यांनी दिली.