◼️ दुकानापुढील अतिक्रमण न काढणारे नगर परिषदेच्या रडारवर
◼️तब्बल १९ दुकानांवर जप्तीची कारवाई
रामटेक :- शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रामटेक नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी उभारण्यात आलेली छोटी-मोठी दुकाने, टपऱ्या आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच परिसरातील अतिक्रमणे हटवली तर काही ठिकाणी रस्त्यावरील साहित्य जप्त केले असून नुकतेच( दि.१३) मे रोजी बसस्टॉप पुढील व राखी तलाव परिसरातील बंद असलेली तब्बल १९ दुकान नगरपरिषद प्रशाषणामार्फत जप्त करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे चांगले चांगले अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईची गेल्या काही दिवसांपूर्वी बाकायदा आखणी करण्यात आलेली होती. मात्र तरी सुद्धा काही दुकानदारांनी आपल्या दुकानापुढील अतिक्रमण न काढण्यातच धन्यता मानली होती अशा शिरजोर दुकानाचे अतिक्रमण जेसीबी मार्फत काढण्यात आले आहे. तसेच सर्वप्रकारच्या पथविक्रेत्यांनी सुद्धा स्थायी प्रकारचे दुकान थाटून अतिक्रमण केले असल्यास असे अतिक्रमण सुद्धा नगरपरिषद रामटेक मार्फत या आठवड्यात हटविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती देताना सांगितले. १३ मे रोजी बसस्टॉप परिसरातील एकूण १७ दुकाने, राखी तलाव परिसर नजिकची २ दुकाने अशी एकूण १९ दुकाने जप्त करण्यात आली असून काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याकरिता पुढाकार घेतला असल्याचेही मुख्याधिकारी यांनी माहिती देतांना सांगितले.
स्थायी स्वरूपाचे अतिक्रमण करू नका-मुख्याधिकारी राऊत
पथविक्रेत्यांना तथा दुकानांपुढे आपल्या वस्तू ठेवणाऱ्यांना माझा विरोध नाही परंतु रहदारीस अडथळा होईल एवढे रस्त्यावर ठेवु नका तसेच दिवसभर धंदा झाल्यावर रात्री दुकान बंद करीत असताना हातठेले वाल्यांनी आपले आपले हातठेले सोबत घेऊन जावे तसेच दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे ठेवलेल्या वस्तू रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानाचे आत मध्ये ठेवण्याची तसदी घ्यावी, शहराला विद्रूप करू नये तथा रहदारीला अडथळा होईल असेही करू नये अन्यथा असे पथविक्रेते तथा दुकानदार कारवाईस पात्र राहील. नगरपरिषद प्रशासनाला यात त्यांनी सहकार्य करावे असेही मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दुकानदारांना आवाहन करीत सांगितलेले आहे.