नागपूर :- नागपूरचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२६’च्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपातील सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा सभापती दर्शनी धवड, जलप्रदाय समिती सभापती दिव्या धुरडे, सुधीर दिवे, माजी क्रीडा सभापती नागेश सहारे, मनपाचे क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर, डॉ. विवेक अवसरे, डॉ. संभाजी भोसले तसेच खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.![]()
उद्घाटन प्रसंगी महापौर नीता ठाकरे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून नागपुरात क्रीडा संस्कृती अधिक मजबूत होत आहे. ‘खासदार क्रीडा महोत्सव’ हा केवळ स्पर्धांचा मंच नसून, शहरातील युवकांना सकारात्मक दिशा देणारा आणि त्यांच्या गुणवत्तेला संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे नागपूरची क्रीडा ओळख अधिक व्यापक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरातील युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगितले. शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, युवा पिढीला प्रोत्साहन देणे आणि विविध खेळांना चालना देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. प्रास्ताविक मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले. संचालन डॉ. पद्माकर चारमोडे यांनी केले. आभार डॉ. संभाजी भोसले यांनी मानले.
‘खासदार क्रीडा महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, नागपूर शहर व परिसरातील मोठ्या संख्येने खेळाडू यात सहभागी होणार आहेत. उद्घाटनानंतर कार्यालयातून महोत्सवाच्या नियोजन आणि नोंदणी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.