– देवलापार, पवनी क्षेत्रातील ५२ केंद्रांवर संकलनाला वेग
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- उन्हाळ्याच्या दिवसांत जंगल परिसरातील गरीब व आदिवासी कुटुंबांसाठी तेंदुपत्ता संकलन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन ठरत असून, देवलापार, पवनी व पवनी एकसंध नियंत्रक वनपरीक्षेत्रातील हजारो मजूर कुटुंबांचा उदरनिर्वाह सध्या तेंदुपत्त्यावर अवलंबून आहे. जंगलातील ‘हिरवे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेंदुपत्त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळत आहे. देवलापार वनपरीक्षेत्रात २२ तेंदुपत्ता संकलन केंद्र, पवनी वनपरीक्षेत्रात १६ केंद्र तर पवनी एकसंध नियंत्रण क्षेत्रात १६ केंद्र कार्यरत आहेत. या एकूण ५२ केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर तेंदुपत्ता संकलन सुरू आहे. यंदाही तेंदुपत्ता हंगामामुळे ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळाली आहे. अनेक शेतमजूर व वनलगतच्या गावांतील नागरिक शेतीकाम नसलेल्या काळात तेंदुपत्ता संकलनाकडे वळतात. विशेषतः आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा हंगाम आर्थिक आधार ठरत आहे. तेंदुपत्ता संकलन प्रक्रियेत मजुरांची गैरसोय होऊ नये, मजुरांनी समूहाने जंगलात जावे, सतर्क राहावे तसेच आगीपासून सावधगिरी बाळगावी, अशा सूचना वन कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. तेंदुपत्ता संकलनामुळे ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळत आहे. पवनी व एकसंध नियंत्रण क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मजूर सहभागी होत आहेत.जंगल परिसरात काम करताना मजुरांनी सतर्कता बाळगावी यासाठी जनजागृती केली जात आहे.तेंदुपत्ता हंगामामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून ग्रामीण भागातील रोजगाराला चालना मिळाली आहे.
संकलन केद्रावर मुलभूत सुविधा नाही
ठेकेदाराने संकलन केद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध केलेल्या नाही.कधी कधी सायंकाळी तर कधी रखरखत्या उन्हात मजूर संकलन केद्रावर येतात. परंतू पिण्याचे पाणी,सावली तसेच प्रथमोपचार पेटी यासारख्या मुलभूत सुविधा संकलन केंद्रावर आवश्यक आहे.त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या दिसून येत नाही.
“तेंदुपत्ता संकलन हा वनलगतच्या गरीब व आदिवासी कुटुंबांसाठी महत्त्वाचा रोजगाराचा स्रोत आहे.संकलन केंद्रांवर मजुरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे. वनविभागामार्फत संकलन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सातत्याने देखरेख केली जात आहे.”
शेषराव टुले, वनपरीक्षेत्र अधिकारी, देवलापार