नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना १ ली ते ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्णपणे मोफत व एकसमान शिक्षण मिळावे, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) युवराज मुंदाफळे यांनी राज्यमंत्री मा. आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर केले.
सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असमानता वाढत असून खासगी शाळा व कॉलेजांच्या वाढत्या फी मुळे सामान्य, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी राज्य सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
• महाराष्ट्रातील १ ली ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण सर्वांसाठी पूर्णपणे मोफत करावे.
• राज्यभर एकसमान शिक्षण व्यवस्था लागू करावी.
• ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
• खासगी शाळा व कॉलेजला मोफत करा शिक्षण एकसमान करा.
• सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पुस्तके व आवश्यक सुविधा शासनाकडून द्याव्यात. “शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असून पैशाअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा.”
या मागणीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन द्यावे व शिक्षण हक्काच्या या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.