spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनी तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा छापा; १४ लाखांच्या मुद्देमालासह दोन ट्रॅक्टर जप्त

हंसराज, भंडारा पवणी :- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई भेंडाळा ते मोखारा मार्गावर करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मस्के आणि त्यांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अवैध रेती वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने एका विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या सोनालिका टायगर डीआय ४२ ट्रॅक्टरला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक रामेश्वर संजय भुरे (वय २७, रा. जुनोना) याने ट्रॅक्टर न थांबवता भेंडाळा शिवारातील शेतात पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याचे पाहून, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चालकाने ट्रॉलीचा हायड्रॉलिक उचलून त्यातील अंदाजे एक ब्रास रेती खाली ओतून दिली. पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) आणि २३८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या कारवाईत, याच मार्गावर हवालदार कटाणे यांच्या पथकाने विजय पंढरी भुरे (वय ४५, रा. जुनोना) याला अवैध रेती वाहतूक करताना रंगेहात पकडले. त्यानेही पोलिसांना पाहून ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टरमधील रेती खाली पसरवून दिली. पोलिसांनी त्याचा विना क्रमांकाचा लाल रंगाचा स्वराज ७४२ एफ.ई. ट्रॅक्टर आणि ट्रॉली, असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मस्के, कटाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास पवनी पोलीस करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.