हंसराज,भंडारा करडी :- करडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे करडी ते किरणपूर जाणारा सिमेंट रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ८७ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे, तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, करडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांना मौजा करडी ते किरणपूर रोडच्या बाजूला काही लोक जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह छापा टाकला. या कारवाईत विजय कुमन तितीरमारे (वय ३०, रा. करडी), संजय सोविंदा बरयेकर (वय ४०, रा. सिल्ली, जि. गोंदिया) आणि रामपुरी भागवत धरीया (वय ३८, रा. सिल्ली, जि. गोंदिया) या तिघांना अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच नामदेव कोठीराम सेलोकर आणि महेंद्र नारायण उके (दोन्ही रा. करडी) हे घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जुगाराच्या डावावरून आणि आरोपींच्या अंगझडतीतून रोख रक्कम, ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल, १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि ७० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एम एच ३६ ए.के-३०४२) असा एकूण ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपींविरुद्ध करडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंभरे, पोलीस शिपाई मेश्राम व त्यांच्या पथकाने केली. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून अधिक तपास करडी पोलीस करत आहेत.