नागपूर :- नागपूर जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी महावितरणने विकासकामांचा धडाका लावला असून, कोट्यवधी रुपयांच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याचा वीजपुरवठा आता अधिक सक्षम आणि विनाखंड होणार आहे.
जिल्ह्यातील वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महावितरण सध्या 322 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा राबवत असून, त्यापैकी 316 कोटींची कामे म्हणजेच तब्बल 98 टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये सिडबी (SIDBI CDF) आणि विशेष सहाय्य योजनेचा मोठा वाटा आहे. विशेषतः नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागात ओव्हरहेड वीज तारांचे रूपांतर भूमिगत वाहिनीमध्ये करण्याचे 46 कोटींचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून, यामुळे तांत्रिक बिघाड आणि पावसाळ्यातील संभाव्य अपघात पूर्णपणे टळणार आहेत.
शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ (MSKVY 2.0) अंतर्गत मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेसाठी नागपूर ग्रामीण मंडळाकरिता कार्यादेश देण्यात आला आहे. या अंतर्गत नवीन उपकेंद्रे उभारणी, अतिरिक्त रोहित्र बसवणे आणि क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. काटोल, उमरेड आणि सावनेर विभागांमधील अनेक उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त रोहित्रांची कामे पूर्ण झाली असून ती कार्यान्वितही करण्यात आली आहेत. काटोलमधील डोरली आणि सावनेर एमआयडीसी येथे नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
शहरी भागातही वीज यंत्रणा बळकट करण्यासाठी महाल, बुटीबोरी आणि सिव्हिल लाईन्स विभागात नवीन उपकेंद्रे उभारली जात आहेत. श्रीक्रष्ण नगर, मानेवाडा आणि बेसा येथील कामे यशस्वीरित्या कार्यान्वित झाली असून, मानकापूर येथील उपकेंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आरडीएसएस (RDSS) योजनेअंतर्गत वीज हानी कमी करण्यासाठी 482 नवीन वितरण रोहित्रांचे (HVDS) उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी 440 रोहित्रे यशस्वीरित्या बसवून महावितरणने मोठे साध्य प्राप्त केले आहे.
यासोबतच, वीज वाहिनी विलगीकरण योजनेसाठी 356.81 कोटींची कामे सुरू असून, याद्वारे 205 वाहिन्यांचे विलगीकरण आणि 1,599 नवीन रोहित्रे बसवण्याचे उद्दिष्ट आहे. महावितरणच्या या नियोजित आणि वेगवान कामांमुळे औद्योगिक क्षेत्राला, विशेषतः बुटीबोरी एमआयडीसीला विनाखंड वीजपुरवठा मिळण्यास मदत होत आहे. एकूणच, 33 केव्ही आणि 11 केव्हीच्या हजारो किलोमीटरच्या नवीन वाहिन्या आणि भूमिगत केबल्समुळे नागपूर जिल्हा ऊर्जा क्षेत्रात प्रगत आणि ‘हायटेक’ बनण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. महावितरणच्या या प्रभावी कामांमुळे केवळ ग्राहकांचा त्रास कमी होणार नाही, तर जिल्ह्याच्या आर्थिक आणि कृषी विकासालाही मोठी गती मिळणार आहे.