spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रगती महिला शेतकरी गटाने तयार केला ४०० लिटर दशपर्णी अर्क

Ø पिंपळापुर येथे सेंद्रिय शेतीचा आदर्श उपक्रम

Ø सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभाग

यवतमाळ :- राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथे प्रगती महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला. कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत गटातील महिलांनी चारशे लिटर दशपर्णी अर्क तयार केला.

रासायनिक खते, कीडनाशके, तननाशके, बुरशीनाशके व संजीवकांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची सुपीकता कमी होत असून प्राणी, पर्यावरण आणि मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत असून उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गटबांधणी करुन शेतकऱ्यांनी एक्त्रित गटशेती व सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

प्रगती महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक शारदा नहाते यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी जनावरे न खाणाऱ्या दहा प्रकारच्या वनस्पती, मिरचीचा ठेचा, लसणाचा ठेचा, गोमूत्र, शेण व पाणी यांचा वापर करून दशपर्णी अर्क तयार केला. या अर्कामुळे कमी खर्चात प्रभावी कीड नियंत्रण होणार असून रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत होणार आहे. गटातील सर्व शेतकरी हंगामभर या अर्काची फवारणी करणार असल्याची माहिती देण्यात आली.

गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. निसर्गातील घटकांचा समतोल राखत तांत्रिक पद्धतीने शेती करण्यावर गटाचा भर आहे.

यावेळी कृषी विभागाचे राहुल मनवर, उमेदचे राजेंद्र कुरपुडे तसेच पाणी फाउंडेशनचे शुभम पंचभाई व रिना ठवकर उपस्थित होते. प्रगती महिला शेतकरी गटातील सदस्यांसह गावातील अनेक शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.