शिक्षण क्षेत्रातील सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे नीट युजी परीक्षेतील गोंधळ. त्यातच आता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या फेरपरीक्षेच्या वेळेवरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता, ही परीक्षा दुपारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अनेक राज्यांत सध्या सुरू असलेली प्रचंड उष्णतेची लाट पाहता, हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी २०२६ ची फेरपरीक्षा २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते ५:१५ या वेळेत होणार आहे म्हणे. खरं तर ही परीक्षा सकाळी घेण्याचे नियोजन होते. मात्र, त्याच दिवशी देशभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सरकारी स्तरावर सामूहिक योग प्रात्यक्षिके आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने सकाळी पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे व्यस्त असेल. यामुळे सकाळच्या सत्रात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे वाढत्या तापमानाचा. सध्या उष्णतेची तीव्र लाट असून अनेक राज्यांमध्ये तापमान ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहे. दुपारी २ वाजता परीक्षा सुरू होणार म्हणजे विद्यार्थ्यांना किमान तासभर आधी केंद्रावर पोहोचावे लागेल. भरदुपारी घराबाहेर पडणे आणि कडक उन्हात प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. भीषण उष्णतेत घामाघूम होत केंद्रावर पोहचून पेपर सोडवताना विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकणे कठीण होईल, तसेच उष्माघाताचा धोकाही वाढू शकतो. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. एकीकडे पेपरफुटीमुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावात आहेत, त्यात आता निसर्गाचे आणि नियोजनाचे हे नवे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. दिल्ली, पाटणा, जयपूर यांसारख्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आधीच आंदोलने सुरू असताना, आता उष्णतेच्या संकटामुळे पालकांनी प्रशासनावर टीका केली आहे. “प्रशासकीय सोयीसाठी मुलांच्या आरोग्याशी खेळ का?” असा सवाल विचारला जात आहे. वाढती उष्णता लक्षात घेता, परीक्षा केंद्रांवर विशेष सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रांवर पिण्याचे पाणी, ओआरएस आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही राज्यात विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष बस सेवा देण्याचेही आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा आरोग्य आणि मनःशांतीचा संदेश देणारा दिवस आहे. मात्र, त्याच दिवशी नियोजित करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची ‘शांती’ हरवल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने केवळ यंत्रणेचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुविधेचा विचार करून योग दिनाचे कार्यक्रम सायंकाळी आयोजित करणे अधिक गरजेचे होते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की योग आणि नीट आयोजकांमध्ये समन्वय आणि आपसी समज तर नाहीच, शिवाय यांचे डोकेही ठिकाणावर नाही. आता या कडाक्याच्या उन्हात लाखो विद्यार्थी कशा प्रकारे या परीक्षेला सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
– प्रा. विलास डोईफोडे, सावनेर