spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिद्धेश्वरी गोंड वस्तीत महावितरणचे विशेष शिबिर; 51 जणांचे वीज जोडणीसाठी अर्ज

नागपूर :- नागपुरातील सिद्धेश्वरी गोंड वस्ती परिसरातील नागरिकांना कायदेशीर आणि हक्काची वीज मिळवून देण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या भागातील वीज ग्राहकांना अधिकृत जोडणी देण्याच्या उद्देशाने सोमवार, 26 मे रोजी एका विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महावितरणच्या या आवाहनाला वस्तीतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी 51 नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे आणि नवीन वीज जोडणीसाठीचा अर्ज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

सुमारे 200 टिनाच्या झोपड्या असलेल्या या सिद्धेश्वरी गोंड वस्तीमध्ये मागील अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. यापूर्वी या भागात लघुदाब वाहिनीवरून अनधिकृत मार्गाने म्हणजेच आकडे टाकून वीज चोरी केली जात होती. वाढती वीज चोरी आणि त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन, काही दिवसांपूर्वी महावितरणने या परिसरातील जुन्या लघुदाब वीज वाहिनीच्या बदल्यात आधुनिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली आणि वीज चोरी अवरोधक केबल टाकण्याची धडक कारवाई केली. या तांत्रिक बदलामुळे अनधिकृत मार्गाने वीज घेणे अशक्य झाल्याने, वस्तीतील अनधिकृत वीज पुरवठा खंडित झाला होता आणि गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता.

या तात्पुरत्या निर्माण झालेल्या अंधाराच्या स्थितीचा गैरफायदा घेत काही घटकांकडून वस्तुस्थितीची शहानिशा न करता, केवळ नकारात्मक चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला. लहान मुलांना समोर करून आणि चुकीची माहिती पसरवून काही माध्यमांमधून विदारक चित्र रंगविण्यात आले. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारच्या अनधिकृत प्रकारांना आळा घालणेही तितकेच गरजेचे होते.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर, महावितरणने केवळ कारवाई करून न थांबता, नागरिकांच्या सुविधेसाठी थेट वस्तीतच विशेष शिबिर सुरू केले. नागरिकांना वीज जोडणीसाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत, म्हणून प्रशासनाने ही थेट दारात सेवा उपलब्ध करून दिली. महावितरणच्या या सकारात्मक पुढाकारामुळे आणि वस्तीतील नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे आता कायदेशीर वीज जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाचा हा समन्वय पाहता, उर्वरित नागरिकही लवकरच अधिकृत वीज जोडणी घेतील आणि संपूर्ण परिसर कायदेशीर विजेच्या प्रकाशाने उजळून निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या आधीही महावितरण्ने सुमारे 40 ग्राहकांना अधिकृत वीज जोडणी देत या वस्तीतील अंधार दुर करण्यात पुढाकार घेतला आहे. महावितरणच्या महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, अतिक्रीक्त कार्यकारी अभियंता संजय मते यांच्या पुढाकाराने या परिसरातील नागरिकांना अधिकृत वीज जोडणी घेण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे.

Popular Articles