spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विद्यापीठात पीएच.डी. प्रबंध सादरीकरण प्रक्रिया डिजिटल : नवीन नियमावली जाहीर, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

 

नागपूर २६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यार्थ्यांसाठी प्रबंध सादरीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. विद्यापीठाने यासाठी नव्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी केली असून, यानुसार आता विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रबंध तसेच प्री-सबमिशन सारांश विद्यापीठाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करता येणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना प्रबंधाच्या सात प्रती व सारांशाची प्रत प्रत्यक्ष विभागात जाऊन सादर करावी लागत होती. त्यासोबत कोर्सवर्कचे प्रमाणपत्र, शुल्काच्या पावत्या, संशोधन लेख आणि विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. याशिवाय संबंधित अधिष्ठात्यांकडून तज्ज्ञांची नावे घेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून होकार मिळवावा लागत होता. त्यानंतरच त्या तज्ज्ञांकडे प्रबंध पाठवला जात होता.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना किमान सहा महिने ते वर्षभर वेळ लागायचा. अनेक वेळा तज्ज्ञांकडून नकार येत असल्याने प्रबंध प्रक्रियेत अधिक विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक व वेळेचा त्रास सहन करावा लागत होता. आता नव्या नियमांनुसार, नोंदणीच्या ३३ महिन्यांनंतर विद्यार्थी सारांश सादर करू शकतात आणि ३६ महिन्यांनंतर अंतिम प्रबंध ऑनलाईन पोर्टलवरून सादर करता येईल. विशेष म्हणजे, यामध्ये तज्ज्ञ निवडीपासून व्हायवा प्रक्रियेपर्यंत सर्व काही ऑनलाईन पद्धतीनेच राबवले जाणार आहे.

कोरोना काळात सुरू करण्यात आलेली ऑनलाईन व्हायवा प्रक्रिया देखील या नव्या नियमावलीत कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार असून, प्रवास, छपाई व इतर खर्चांपासून सूट मिळणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे प्रबंध सादरीकरण प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपी झाली आहे. नागपूर विद्यापीठाने डिजिटल वळणाकडे टाकलेले हे पाऊल इतर विद्यापीठांसाठीही आदर्श ठरू शकते.

Popular Articles