spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावनेरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीला अटक

 

नागपूर, २६ : इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून सावनेर तालुक्यातील एका लॉजवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त  माहितीनुसार, पीडित मुलीच्या पालकांनी खापा येथील १७ वर्षीय मुलीची २०२३ मध्ये शादाब शेख नावाच्या तरुणासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दहावीत शिकत असताना तिने आपल्या आईच्या मोबाईलवरून इन्स्टाग्राम खाते उघडले होते. शादाबने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर दोघांमध्ये मेसेजद्वारे संभाषण सुरू झाले. काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांना भेटू लागले.

१८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मुलीचे आई-वडील शेतात कामासाठी गेले असताना ती घरी एकटीच होती. याचवेळी शादाबने तिला फोन करून सावनेर येथे भेटण्यासाठी बोलावले. पीडित मुलगी बसने सावनेरला पोहोचली, जिथे शादाब तिला घेण्यासाठी आला होता. त्यानंतर दोघे मोटारसायकलने वाकी रोडवरील एका लॉजवर गेले. तिथे शादाबने तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेनंतर आरोपी शादाबने पीडित मुलीला ही बाब कोणालाही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीने हिंमत करून घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पालकांनी खापा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

खापा ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन जंगम यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी शादाब शेखला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.