spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तीन महिन्यात हजारावर निक्षय मित्र

– टीबीमुक्त भारत अभियानासाठी नागपूर विभागाचा पुढाकार

– राज्यात ४० हजार पोषण आहार किट्सचे वितरण

नागपूर :- भारत सरकारच्या टीबीमुक्त भारत अभियानात महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतला असून, मार्च ते मे २०२६ या तीन महिन्यात १२९८ निक्षय मित्रांची नोंदणी झाली आहे आणि त्यांच्यामार्फत ४०,७६५ पोषण आहार किट्सचे वितरण क्षय रुग्णांना करण्यात आले आहे.

राज्यात क्षयाचे संपूर्ण निर्मूलन होण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला आहे व तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. भारत सरकारतर्फे टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र योजना सुरू करण्यात आली असून, यात हे निक्षय मित्र क्षय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे शासकीय यंत्रणेसहच लोकसहभाग हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यात कोणीही व्यक्ती किंवा संस्था क्षय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या उपचारादरम्यान त्यांना सकस आहार तसेच अन्य मदतीची जबाबदारी घेत असते.

क्षय रुग्णांना औषधोपचारांसहच प्रथिनेयुक्त सकस आहाराची गरज असते. पोषक आहारमुळे क्षय रुग्ण बरे होण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. त्यामुळेच हा पोषण आहार किंवा क्षय रुग्णांच्या अन्य मदतीसाठी भारत सरकारतर्फे निक्षय मित्र होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात कोणीही नागरिक, सामाजिक संघटना, कॉर्पोरेट (सीएसआर), राजकीय पक्ष, सहकारी समिती, संस्था सहभागी होऊ शकतात. निक्षय मित्र कमीत कमी ६ महिने क्षय रुग्णांना दत्तक घेऊ शकतात.

निक्षय मित्राने दत्तक घेतलेल्या क्षय रुग्णाला प्रत्येक महिन्यात पौष्टिक आहार किट, मानसिक सहकार्य करणे अपेक्षित आहे. निक्षय मित्र होण्यासाठी किंवा या योजनेबाबत अधिक माहितीसाठी निक्षय पोर्टलवर नोंदणी करता येते.

टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत २४ मार्च २०२६ ते २४ मे २०२६ या शंभर दिवसांच्या कालावधीत नागपूर विभागात एकूण ८४३ आयुष्मान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ९४,३८० स्त्री- पुरुषांची तपासणी करण्यात आली. या काळात २८५३ नवीन क्षय रुग्ण आढळून आले. तसेच ७५० लक्षणे नसलेले क्षयरुग्णही यात आढळले.

२४ मे पर्यंतच्या शंभर दिवसात विभागात एकूण १२९८ निक्षय मित्रांची नोंदणी झाली. यात भंडारा (४), चंद्रपूर (८५), गडचिरोली (६७), गोंदिया (४), नागपूर ग्रामीण (९), नागपूर शहर (३), वर्धा (८५) अशी निक्षय मित्रांची संख्या आहे.

शंभर टक्के बरा होणारा आजार

योग्यवेळी निदान, योग्य उपचार आणि पोषक आहार मिळाला तर या आजाराचा रुग्ण १०० टक्के बरा होतो. त्यामुळे क्षयाविषयी गैरसमज टाळावा. जवळच्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात निक्षय मित्र योजनेची माहिती मिळू शकते, असे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी सांगितले.

समाजाने पुढे यावे

क्षय रुग्णांना पोषक आहार पुरविण्यासाठी व्यक्ती किंवा संस्थांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे. क्षयाच्या संपूर्ण निर्मूलनाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबवित आहे. हे कार्य अधिक वेगाने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. पोषक आहार मिळाला तर रुग्ण बरे होण्याचा वेग वाढतो असे एका अभ्यासात स्पष्ट झाल्याचेही डॉ. शंभरकर यांनी सांगितले.

Popular Articles